बारा गांवचे पाणी - भाग तिसरा २००५ - २००६ मधील मासिक बहर मधे " बारा गांवचे पाणी " ही मालिका प्रकाशित झाली होती . ती आता नव्या रूपात पुनःप्रकाशित होत आहे . आपले अभिप्राय कळवावे . - नरेन्द्र कुलकर्णी बारा गांवचे पाणी - गांव तिसरे – सांगली नाट्याची पंढरी; सहकाराची विष्णुपुरी उद्योगाची अलंकापुरी; शिक्षणाची काशी सहा गल्ल्यांनी बनलेले गांव - सहा गल्ली - सांगली. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले टुमदार छोटेखानी गांव. खरं तर गावाचा इतिहास फारसा जुना नाही. मिरज, कराड वगैरे नांवे पोथ्या पुराणात आढळतात, पण सांगली नाही. सुरुवातीला मिरज प्रांतात येणाऱ्या सांगलीचे नंतर जिल्ह्याची राजधानी म्हणून रूपांतर झाले आणि मिरज हे तालुक्याचे गांव बनून राहिले. १७६७ मधे श्रीमंत माधवराव पेशव्यांनी हरीपूर हे गांव वसवण्यास मंजुरी दिली. तेव्हाही सांगली हे एक खेडेच होते. मिरज प्रांताचे शिवाजी महाराजांपासून चे सरदार, कदम कुटुंबीय होते. त्यातील शेवटचे सरदार इंद्रोजी कदम निपुत्रिक मरण पावले आणि प्रांताची जबाबदारी राजे या नात्याने त्यांचे फ...