बारा गांवचे पाणी - भाग तिसरा

 

२००५ - २००६ मधील मासिक बहर मधे "बारा गांवचे पाणी" ही मालिका प्रकाशित झाली होती. ती आता नव्या रूपात पुनःप्रकाशित होत आहे. आपले अभिप्राय कळवावे.

-      नरेन्द्र कुलकर्णी

बारा गांवचे पाणी - गांव तिसरे – सांगली

नाट्याची पंढरी; सहकाराची विष्णुपुरी

उद्योगाची अलंकापुरी; शिक्षणाची काशी

सहा गल्ल्यांनी बनलेले गांव - सहा गल्ली - सांगली. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले टुमदार छोटेखानी गांव. खरं तर गावाचा इतिहास फारसा जुना नाही. मिरज, कराड वगैरे नांवे पोथ्या पुराणात आढळतात, पण सांगली नाही.

सुरुवातीला मिरज प्रांतात येणाऱ्या सांगलीचे नंतर जिल्ह्याची राजधानी म्हणून रूपांतर झाले आणि मिरज हे तालुक्याचे गांव बनून राहिले. १७६७ मधे श्रीमंत माधवराव पेशव्यांनी हरीपूर हे गांव वसवण्यास मंजुरी दिली. तेव्हाही सांगली हे एक खेडेच होते. मिरज प्रांताचे शिवाजी महाराजांपासून चे सरदार, कदम कुटुंबीय होते. त्यातील शेवटचे सरदार इंद्रोजी कदम निपुत्रिक मरण पावले आणि प्रांताची जबाबदारी राजे या नात्याने त्यांचे फडणीस गोविंद हरी पटवर्धन यांच्याकडे आली आणि १९४८ पर्यंत पटवर्धन हेच सांगलीचे राजे राहिले.

मिरजेचे सहावे राजे गंगाधरराव पटवर्धन व त्यांचे पुतणे चिंतामणराव पटवर्धन यांचे मतभेद झाले आणि १८०१ मधे चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीला स्थायिक होऊन मोठे करायचे ठरवले. सांगली ही स्वतःची राजधानी म्हणून घोषित केली. गावाची नवीन आखणी केली गेली. पेठा आखल्या. गणेश दुर्गाचे काम हाती घेतले. वेळ बराच लागला सर्व घड्या बसवायला. १८४४ च्या रामनवमीला सध्याच्या मंदिरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली. सहसा गणपती सोबत रिद्धी व सिद्धी नसतात, ज्या इथे पहायला मिळतात.

मंदिराचा परिसर खूप मोठा व रमणीय आहे. शेजारीच हत्तीची खास पागा आहे. इथल्याच 'सुंदर नावाच्या हत्तीच्या बऱ्याच कथा प्रचलित आहेत. तो संकष्टीला उपवासही करत असे. सुंदरच्या अंबारीमधून गणपतीची मिरवणूक निघत असे. त्यानंतर बबलू नावाचा पण हत्ती आणला होता. त्यानेही मंदिराची खूप सेवा केली.


१८४३ मधे सांगलीत एक महत्वपूर्ण घटना घडली. ती म्हणजे विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगलीच्या राजवाड्यात दरबार हॉल मधे 'सीता-स्वयंवर' या नाटकाचा पहिला वहिला प्रयोग झाला. पुढेही भावेंनी अनेक नाटके बसवली. त्यांना सतत राजाश्रय मिळत राहिला, तो त्यावेळचे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांच्या मुळे.

१८८० मधे आण्णासाहेब किर्लोस्करांनी 'शाकुंतल सादर करून संगीत नाटकांचा पाया घातला. नंतर त्यांचेच शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांनी रंगभूमीवर नवनवीन लेण्या रचल्या. आजही त्यांचे सांगलवाडीतील घर पहायला मिळते. त्यांची 'संशयकल्लोळ', शारदा’, 'मृच्छकटीक वगैरे अनेक नाटके अजरामर ठरली. 

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजवला तो अजून एका सांगलीच्याच नाटककाराने. त्यांचे नांव कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. त्यांच्या मानापमान’’, स्वयंवर’’, अशा अनेक नाटकांनी जनमानसांवर अधिपत्य गाजवले. पुढे मामा पेंडसे, मा. अविनाश यांनीही सांगलीचे नाव कायम उंचीवर ठेवले. मा. दीनानाथांनी सहकुटुंब बराच काळ सांगलीत घालवला.

याशिवाय अनेक बाबींमधे सांगली नेहमी पुढे राहिली. १८६१ मधे शाळा, १८६३ मधे वाचनालय, १८६५ मधे वेद-पाठशाळा ही काही उदाहरणें. १८८७ मधे रेल्वे आली आणि प्रगती वेगाने होऊ लागली. १९२९ मधे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी आयर्विन पुलाचे उदघाटन केले.

पुण्यामधे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी शिक्षणाचा सखोल पाया रचताना प्रथम १८८० मधे न्यू इंग्लिश स्कुल व नंतर १८८४ मधे डेक्कन एजुकेशन सोसायटीची स्थापना केली. सुमारे १९१७ च्या आसपास मिरज प्रांतात शिक्षणाची दारे उघडावीत या हेतूने डेक्कन एजुकेशन सोसायटीने मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या साहाय्याने विलिंग्डन महाविद्यालयाची स्थापना केली. २२ जून १९१९ या दिवशी सध्याच्या राणी सरस्वती कन्या शाळेच्या जागी हे महाविद्यालय सुरु झाले. माझे भाग्य की अकरावी व बारावी या महाविद्यालयात मला शिकायला मिळाले.

सध्याच्या विश्रामबाग परिसरात पटवर्धन राजांच्या कृपेने खूप मोठी जागा शिक्षण संस्थांना दिली गेली व त्या परिसरात विलिंग्डन महाविद्यालय, सर चिंतामणराव पटवर्धन वाणिज्य महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय वगैरे शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या व त्या संस्था पूर्ण परिसरातील शैक्षणिक भूक भागवत आहेत.


१९४२ च्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याच काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील तुरुंगात डांबले गेले होते. २४ जुलै १९४३ या दिवशी तुरुंग फोडून पळताना दादा खांद्याला गोळी लागून जखमीही झाले होते.

स्वातंत्र्यानंतर ८ मार्च १९४८ या दिवशी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. वसंतदादांच्या पुढाकाराने १९५६ मधे सहकारी साखरकारखाना उभा राहिला व एका नव्या सहकार क्रांतीचा उगम झाला. एकेकाळी आशियातील हा सर्वात मोठा साखर कारखाना होता.

कृष्णेच्या सुपीक खोऱ्यामुळे इथले पीक खूप चविष्ट असते. हळद, भुईमूग, तंबाखू आणि ऊस यांचे प्राधान्य. याशिवाय, कपास, हरभरा, शाळू आणि दूधदुभते यांची रेलचेल आहेच. जवळचे माधवनगर हातमागांसाठी खूप प्रसिद्ध झाले. सांगलीचा सराफकट्टा सोन्या चांदीच्या नवनवीन दागदागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. पु ना गाडगीळ सराफ सांगलीचेच.

सांगलीचा राजवाडा, वस्तुसंग्रहालय, प्रतापसिंह उद्यान व आंबराई पार्क वगैरे पाहण्यासारख्या आहेत. शिवाय गोरे बंधूंची भडंग विसरू नका.

सांगलीच्या जवळ बरेच काही पाहण्यासारखे आहे. पैलवानांच्या तालमी, आरोग्य सुविधांचे केंद्र आणि तालवाद्यांचे माहेरघर - मिरज, नागपंचमीला गर्दी खेचणारे बत्तीस शिराळा, दत्तात्रयांचे जागृत स्थान - औदुंबर, सागरेश्वरचे अभयारण्य वगैरे.

Comments

Popular posts from this blog