बारा गांवचे पाणी - भाग चौथा

२००५ - २००६ मधील मासिक बहर मधे "बारा गांवचे पाणी" ही मालिका प्रकाशित झाली होती. ती आता नव्या रूपात दर महिन्याला पुनःप्रकाशित होत आहे. आपले अभिप्राय कळवावे.

-      नरेन्द्र कुलकर्णी

बारा गांवचे पाणी - गांव चौथे – अहमदनगर

अनेक गावांचा स्थ‍ापना दिवस म्हणजेच ते गाव कुठल्या दिवशी जन्माला आलं ते माहित नसतं, पण अहमदनगरचे असं नाही. २८ मे १४९० या दिवशी अहमदनगर गावाचा जन्म झाला.

अहमदनगर - एकही कान, मात्र, उकार व वेलांटी नसलेल्या नावाचे गांव. सर्वजण पण रूढार्थाने 'नगर च म्हणतात. पुण्याहून औरंगाबाद, जळगाव व नागपूरला जाणाऱ्या प्रत्येक गाडीला अहमदनगर वाटेत लागतेच. पुण्याहून अक्षरश: २। तासात नगरला पोहोचतो. आता तर रस्ताही खूप छान झाला आहे. नगर गाव मुळातच उंच ठिकाणी आहे. कोणत्याही दिशेने पोहोचताना घाट चढूनच जावे लागते.

अहमदनगरला फार मोठा इतिहास आहे.

मूळ पाथ्री, परभणीच्या कुलकर्णी घराण्यातील तिमापा, चरितार्थ शोधण्याच्या निमित्ताने विजयनगर कडे निघाले. वाटेत पकडले गेले. गुलाम म्हणून बहामनी राजाला विकले गेले. अनन्वित छळाला कंटाळून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला व त्यांनी निझाम उल-मुल्क मलिक असे नाव धारण केले. पुढे स्वतःच्या कर्तृत्वावर महंमद शाह बहमनी – दुसरा, या राजाच्या राज्याचे वजीर (पंतप्रधान) बनले. पुढे त्यांनी त्यांचे चिरंजीव मलिक अहमद याला पूर्ण तयारीनिशी बीड व जुन्नर भागात दौलताबादवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवले. अहमद खूप शूर व धोरणी निघाला. त्याने १४९० मध्ये जहांगीरखानाला गनिमी काव्याने पराभूत केले व पराभूत केलेल्या जागी नवीन शहर वसवले ते हे अहमदनगर.

 


१४९० - १५०८ - अहमद निजामशाह:

आधीच्या बहमनी राजवटीला कंटाळून सर्व भूमिपुत्र एकत्र आले व त्यांनी अहमद निजामशहाला साथ दिली. अहमदने निजामशाही स्थापन करून १८ वर्षे सुराज्य केले. त्या काळात त्याने राज्याचा मोठा विस्तार केला. महाराष्ट्राचा जवळपास सर्व पश्चिम भाग जिंकून घेतला. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. काही वर्षांतच अहमदनगर एक सुंदर शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. कैरो व बगदाद च्या खालोखाल अहमदनगरचे नाव गाजू लागले. त्याच्या काळात राज्याची भरभराट झाली. सर्व धर्मियांना त्याने समान वागणूक दिली. गावाचा विस्तार केला. कापूरबावडी तलावापासून पाण्याचे खापरी नळ टाकून गावाला पाणीपुरवठा केला. बळकट सेना बनवली. व अनेक उत्तम इमारती व बागा बांधल्या. त्यांपैकी काही आजही पहायला मिळतात. बागरोजामधे तो चिरविश्रांती घेत आहे.

 १५०८ - १५५३ - बुर्हाण निजामशाह

अहमदच्या मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी बुर्हाण निजामशाह गादीवर आला. अतिशय हुशार आणि विद्याव्यासंगी. वडिलांचे राज्य खूप मोठे केले. सुरुवातीला वडिलांनी दगडमातीचा बांधलेला नगरचा किल्ला मजबूत केला. अहमदनगर वर आक्रमणे वाढली. त्याला उत्तर म्हणून इथे तोफखाना सुरु केला. तुर्कस्थानातून रूबिखानाला बोलावून घेतले. विजापूरमधे असलेली मुलुखमैदान तोफ इथेच गाळली गेली. अनेक धार्मिक साधू इथे येऊन स्थायिक झाले. बुर्हाणनगरची स्थापना त्यानेच केली, जे तुळजाभवानीचे जन्मस्थान आहे.

 १५५३ - १५६५ - हुसेन निजामशाह

बुर्हाण निजामशाह च्या १५५३ च्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुसेन निजामशाह गादीवर आला. त्याने राज्याची अजून भरभराट सुरु ठेवली. त्याच्याच काळात त्याने पोर्तुगीज अभियंत्यांच्या साहाय्याने १५५३ ते १५६२ या काळात नगरचा किल्ला होता, त्या जागीच भक्कम तटबंदीसह नव्याने बांधून काढला, जो आजही तसाच पहायला मिळतो. सुमारे १०० एकरवर पसरलेला हा किल्ला जगातील काही अभेद्य भुईकोट किल्यांपैकी एक समजला जातो. त्याला २२ बुरुज आहेत. तटाभोवती खोल खंदक आहे. सुरुवातीला बांधलेल्या या खंदकाच्या भोवतीपण एक उंच भिंत होती. त्यामुळे बाहेरून येणाऱ्याला किल्ला दिसायचाच नाही.

हुसेन च्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्याबरोबर तालिकोटची महाप्रचंड लढाई झाली. त्या लढाईमधे हुसेनच्या गुलाम अली नावाच्या हत्तीने शत्रू राजालाच सोंडेने पकडून खाली आणले. राजा पडल्यावर सैन्य सैरभैर झाले व हुसेनने ही लढाई सहज जिंकली. त्या हत्तीची सुंदर समाधी बागरोजा परिसरात आजही पाहायला मिळते.

१५९५ - १६०० - सुल्ताना चांदबिबी



हुसेन निजामशाहची मुलगी चांदबिबी. लहानपणापासून तिला मुलाप्रमाणे वाढवले. युद्धकलेत ती पारंगत होतीच, शिवाय तिला अनेक भाषा अवगत होत्या. विजापूर सलतनशी संबंध दृढ व्हावे या हेतूने हुसेनने चांदबिबीचे विजापूरच्या अली अदिलशाहशी लग्न लावून दिले. अली आदिलशाहच्या १५७९ मधील मृत्यूनंतर विजापूरमध्ये बेबनाव झाला. चांदबिबीला साताऱ्याच्या तुरुंगात डांबले गेले. काही महिन्यांनी सुटकेनंतर ती नगरला परतली. नगरला आल्यावर तिने भाऊ मुर्तझा निजामशाह बरोबर राज्य वाढवण्यात हातभार लावला.

निजामशाहीची ती सेनापती बनली. नोव्हे १५९५ मधे अकबराचा मुलगा मुराद याने अहमदनगरवर मोठा हल्ला चढवला. अथक प्रयत्नानंतर सततच्या माऱ्यामुळे किल्ल्याची भिंत ढासळली. चांदबिबी ने माणसे लावून रात्रीतून ती भिंत बांधून काढली. आजही भिंतीचा एक भाग वेगळ्या चुन्यात दिसतो तो हाच भाग. अतिशय शूर वीरांगनेला इतिहासात मानाचे स्थान आहे. दुर्दैवाने अफवेला बळी पडून तिच्याच सैनिकांनी तिचा खून केला व तिची दैदीप्यमान कारकीर्द संपली. आज विश्वातील अग्रेसर महिलांमधे तिला मानाचे स्थान आहे.

 

चांदबिबीच्या काळात ७ मजली एक सुंदर महाल बांधला गेला. आज त्याचे ३ मजले शाबूत आहेत. त्याला चांदबिबीचा महाल म्हणतात. पण खरे तर ही एक सरदार सलाबत खान आणि त्याची पत्नी यांची कबर आहे.

 


१६०० - १६२६ - मलिक अंबर

मलिक अंबरचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील हरारे इथे १५४८ मधे झाला. लहानपणीच गुलाम म्हणून विकला गेलेला मलिक अंबर, कासीम अल बगदादी बरोबर बगदादहून भारतात आला आणि बगदादीच्या मृत्यूनंतर आधी विजापूर आणि नंतर निझामाच्या दलात सामील झाला. नेतृत्त्वाचे गुण, मूळची हुशारी आणि शूर लढवय्या या सर्वांमुळे तो लवकर लवकर वर चढत गेला व निजामशाहीचा वजीर बनला. चांदबिबीच्या मृत्यूनंतर त्यानेच वजीर या नात्याने राज्य चालवले. जमिनीची महसूल व्यवस्था आणि गनिमी कावा या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मलिक अंबरने शोधल्या व रुजवल्या.

 त्याने औरंगाबाद वसवले आणि तिथे पाण्याची उत्तम व्यवस्था लावून दिली.  त्याच्याच मार्गदर्शनाखाली शहाजीराजे मोठे बनले. मलिक अंबरने मुघलांशी सतत लढा दिला व निजामशाही शाबूत ठेवली. त्याच्या मृत्यूनंतर १० वर्षातच निजामशाही मुघलांनी गिळंकृत केली.

 एकंदरीत या गावाने अनेक लढाया पाहिल्या. निझाम, मुघल, पेशवे आणि ब्रिटिशांनी इथे हुकूमत गाजवली. १६३६ मधे शहाजहानने निजामशाही संपुष्टात आणताना बरीच घरं नेस्तनाबूत केली आणि नव्याने वसवली. शहाजी आणि जिजाऊ यांचे लग्न इथेच झाले आणि औरंगजेबाचा मृत्यू इथलाच.

 सहाशे वर्षांहून जुना नगरचा किल्ला मात्र अजूनही दिमाखात उभा आहे व नक्की पाहण्यासारखा आहे. त्याच्याभोवतीचा खोल खंदक आणि अभेद्य तटबंदी यामुळे तो खरोखरच अजिंक्य राहिला. खंदकावरील झुलता पुल खूप महत्त्वाचा. शत्रूचे सैन्य त्याच्यावर उभं राहिलं की साखळदंडाच्या मदतीने तो पूलच खाली आणता येतो आणि सर्व सैन्य खंदकात पडते. किल्ल्याचे सगळे दरवाजे अजूनही अभेद्य आणि शाबूत आहेत. इ स १७५९ पासून हा किल्ला व पर्यायाने नगर पेशव्यांच्या ताब्यात आले, तर १८०३ पासून ब्रिटिशांच्या.  प्रत्येक राजवटीला किल्ल्याने चोख साथ दिली.

 पुढे ब्रिटिशांनी या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर केला. पंडित नेहरूंनी या किल्ल्यात कैदेत असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले. सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद आणि महात्मा गांधी या किल्ल्यात कैदेत होते. त्या खोल्या शाबूत आहेत. आज भारतीय स्थलसेनेचा इथे खूप मोठा पसारा आहे. रणगाडे दुरूस्त करण्याचे फार मोठे सेंटर नगरमधेच आहे.

प्रामुख्याने मुस्लिमांची राजवट बराच काळ होती, त्यामुळे नगरमधे जागोजागी मशिदी पाहायला मिळतात.  त्यातील काही मशिदी अगदी पाहण्यासारख्या आहेत. दमडी मशीद (दमडी दमडी जमवून बनवलेली), कवडी मशीद (कवडी कवडी जमवून बनवलेली), दो बोटी चिरा मशीद, वगैरे. प्रत्येक मशिदीला काहीतरी कहाणी आहे. उदा. दो बोटी चिरा - या ठिकाणी दोन दगडांमध्ये बरोबर दोन बोटे जातील एवढीच जागा आहे. मात्र अगदी लहान मुलांचीही दोनच बोटे जातात तर मोठ्या माणसाची सुद्धा दोनच बोटे जातात.

औरंगजेबला ज्या ठिकाणी ९१ व्या वर्षी मृत्यू झाला ते म्हणजे भिंगार रोडवरील आलमगीर हे ठिकाण. इथे एक मशीद आणि बारादरी आहे, जिथं गुप्तपणे खलबते व्हायची. मशिदीत एक वाचनालय आहे व तिथे अत्यंत दुर्मीळ अशा कुराणाच्या प्रती जपून ठेवल्या आहेत.  औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेले कुराण आजही तिथे बघायला मिळते.

फार पूर्वी नगरला मोठी वेस होती व आठही दिशांना आठ दरवाजे होते. आज त्यातले फक्त दोनच दरवाजे शिल्लक आहेत. एक माळीवाडा वेस व दुसरा दिल्ली दरवाजा. जेमतेम अंबारीसह हत्ती जाईल एवढी उंची. रोज रात्री न चुकता अडसर व कड्या कुलूप लावून बंद व्हायचे. पूर्ण अहमदनगर आजही इतिहासाचा वारसा जतन करून आहे. असंख्य मशिदी, ५०० ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेले अनेक महाल, बाग आजही अभ्यासकांना आकर्षित करत काळाशी टक्कर देत  उभे आहेत.

ख्रिस्ती मिशनर्‍यांनीही ईथे छान जम बसवलेला आहे. रे. ना. वा. टिळक व सौ. लक्ष्मीबाई टिळक यांनी नगरमधे खूप मोठा काळ व्यतीत केला. १९०२ मधे बांधलेले ह्यूम मेमोरियल चर्च हे त्याची साक्ष देते. श्री. सुरेश जोशी यांच्या अथक प्रयत्नांनंतर नगरमधे वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. असंख्य दुर्मिळ गोष्टी ईथे पहायला मिळतात. उदा. १८३६ मधला नगरचा नकाशा. निजामाने बसवून घेतलेल्या मातीच्या पाणीव्यवस्थेचे अवशेष वगैरे.

सांस्कृतिक क्षेत्रातही नगर मागे नाही. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर नगरचेच. श्री. प्रमोद कांबळेंनी सुप्रसिद्ध कलाकार म्हणून नांव कमावले. त्यांनी नगरच्या महावीर कलादालनात १५' लांब व ८' ऊंच भिंतीवर भारतातील ५०० महत्वाच्या व्यक्तींची पेन्सिलीने अप्रतिम चित्रे काढली. यांत संत, गायक, खेळाडू, नेते, वगैरे अनेकांचा समावेश आहे. जगातील हे सर्वात मोठे पेन्सिल चित्र आहे. कांबळेंनी त्यांच्या चित्रकला व शिल्पकला शिकवण्याचे मोठे काम सुरू केले. काही वर्षांपूर्वी त्यांचा स्टुडियो आगीत जळून भस्मसात झाला. त्यांनी नव्या उभारीने त्याची पुननिर्मिती केली.

नगरला भाज्या व दुधदुभते भरपूर मिळते. ईथला खवा खूप प्रसिद्ध आहे. त्यामानाने नगरमधे बरीच स्वस्ताई आहे. कापडबाजारातील सारडाकडे पूर्ण देशातून कापडखरेदीला येण्याची अनेक दशके जुनी प्रथा आहे. (लग्नाचा बस्ता). तसेच कोहिनूर नेही बरेच नांव कमावले आहे. नगरची Industrial Area गेल्या काही दशकात नावारूपाला आली. L&T, Kenetic, Crompton Greeves, Exide, Sun pharma यांसारख्या अनेक कंपन्यांनी छान बस्तान बांधले आहे.

नगरच्या अगदी जवळ बुर्‍हाणनगर या जागी भवानी माता एका तेल्याच्या घरी प्रकट झाली व नंतर तुळजापूरला जाऊन स्थाईक झाली. भवानीचे खूप छान मंदीर आहे. नवरात्रात तिसर्‍या दिवशी ईथूनच माहेरची साडीचोळी तुळजापूरला जाते. केडगांवला रेणुकामातेचे मंदीरही भक्तांची गर्दी खेचते.

अहमदनगर जिल्ह्यात भरपूर ऊस पिकतो, त्यामुळे खूप साखर कारखाने आहेत. शिवाय ज्ञानेश्वरांचे नेवासा, साईबाबांचे शिर्डी, श्री क्षेत्र देवगडचे दत्त मंदिर, मोहोटादेवीचे मंदीर आणि शनी शिंगणापूर ही महत्त्वाची देवस्थाने इथून जवळच आहेत. राम, सीता व लक्ष्मण यांनी वास्तव्य केलेलं डोंगरगण, मुळा नदीवरील भंडारदरा येथील धरण, ट्रेकर्सची पंढरी हरिश्चंद्रगड ही ठिकाणे लोकप्रिय आहेत. पुढच्या वेळी पुणे औरंगाबाद प्रवासात नगरवरून नुसते पुढे जाऊ नका, तर या ऐतिहासिक गावाला जरूर भेट देऊन पुढे निघा. 

(वरीलपैकी बरीचशी माहिती विकिपीडिया आणि श्री. भूषण देशमुख यांच्या भाषणातून मिळवली आहे.)

 

Comments

Popular posts from this blog