बारा गांवचे पाणी - गांव
सातवे- कराड
मुंबई
बेंगलोर हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा हायवे. सातारा ते कोल्हापूर यांमधे रिकामे
पठार लागते. त्या पठारावर कऱ्हाड उर्फ कराड गांव लागतेच. आणि कोकणातून जर कुंभार्ली
घाटातून पाटणकडे याल तर हळूहळू सह्याद्रीची कडेकपारी संपून सपाट प्रदेश लागतो. आजूबाजूचे
सगळे डोंगर अचानक नाहीसे होतात. काळ्या मातीत डोलणारी हिरवीगार रसरशीत शेते दिसू लागतात
आणि मग समजायचे की कराड आले. खरं तर रोडपेक्षा रेल्वेने जर साताऱ्याहून किंवा सांगलीहून
कराडला आलात तर निसर्गाची खरी कमाल पहाता पहाता कराड कधी येते ते कळतच नाही. कराडच्या
पंचक्रोशीत फक्त दोनच डोंगर दिसतात. एक सदाशिवगड आणि दुसरा आगाशिवा.
कृष्णा
आणि कोयना या दोन नद्या महाबळेश्वरला उगम पावतात. सुमारे १३० किमी चा वेगवेगळा प्रवास
करतात आणि कराडला एकमेकींना भेटतात. ही भेट इतकी वेगळी की अगदी जणू दोन बहिणी समोरासमोरून
येऊन घट्ट मिठी मारतात. आणि मग एकत्र झालेले पाणी ९० अंशात वळून पुढे वाहू लागते. त्यामुळे
इंग्लिश T आकार तयार होतो. पूर्ण पृथ्वीवर दोन नद्यांचा असा हा एकमेव संगम. त्यामुळे
त्याला प्राप्त झालेले 'प्रीतिसंगम’ हे नाव सार्थ आहे. सोबतच नकाशा पहावा.
दोन
नद्यांचे पाणी अगदी समोरासमोरून येऊन मिसळते. त्यामुळे संगमात खूप भोवरे तयार होतात
आणि अगदी पट्टीचे पोहोणारे पण संगमात पोहायला जायला कचरतात. पुरामधे तर या जागेचे रौद्ररूप
छातीत धडकी भरवते. फार पूर्वी या संगमात खूप सुसरी असायच्या. पण आता मनुष्यवर्दळीमुळे
त्या गायब झाल्या.
पौराणिक
ग्रंथांमधे व त्या काळातील शिलालेखांमधे कराडचा उल्लेख 'करहाटक ' (हत्तीचा बाजार) या
नावाने आढळतो. कारण काही दस्तऐवजात हे हत्ती विक्रीचे ठिकाण होते असेही सांगितले आहे.
महाभारतातही करहाटक असा कराडचा उल्लेख आहे. सहदेवाने त्याच्या दक्षिण स्वारीत जिंकून
तिथे अधिपत्य गाजवले. पुढे चालुक्य आणि यादव काळात कराड हे मुख्य व्यापारी केंद्र असल्याचा
इतिहास सांगितला जातो. आजूबाजूच्या परिसरातून माल मोठ्या प्रमाणावर इथे विक्रीला येतो.
आजही इथला बाजार पहाण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याचा तळ
येता जाता कराडमधे हमखास असायचा.
प्रीतिसंगमावर
कृष्णामाईचे अतिशय सुंदर व जागृत देवस्थान आहे. देवळाच्या समोरून सुंदर घाट नदीला घेऊन
जातो. याच घाटावर अनेक प्रवचने, कीर्तने आणि जत्रा वारंवार भरतात. नदीला पूर आला की
सहसा हे मंदीर पाण्याखाली जातेच. या मंदीराच्या समोरच खूप मोठी बाग व माजी मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. संध्याकाळी इथे फिरायला येणाऱ्यांची झुंबड असते.
भेळ वाले, छोटी छोटी खेळणी विकणारे यांची चांगली कमाई होतेच.
घाटावरून थोडे वर आले की पंतांचा कोट लागतो. हा
खूप जुना शिवकाळाच्या आधीचा भुईकोट किल्ला होता. याची फारशी माहिती उपलब्ध नाही. या
परिसरात पडक्या इमारती जास्त आहेत. पण खूप गूढ अशी 'नकट्या रावळ्याची' विहीर मात्र
जरूर पाहण्यासारखी आहे. लहान असताना मला या विहिरीजवळ जायला भीती वाटायची. कारण ती
भुतांनी भरलेली आहे असे सगळे सांगायचे.
तिचे
बांधकाम साधारण बहामनी काळातील असून या बांधलेल्या विहिरीमधे एकही देवाची मूर्ती आढळत
नाही. चारही बाजूनी घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली ही विहीर ४१.५ मी लांब आहे.
त्यात ३०.५ मी लांबीचा सोपानमार्ग असून खोल खाली ११ मी x ११ मी चौरसाकृती मूळ विहीर
आहे. विहिरीत उतरायला ८४ पायऱ्या आहेत. या विहिरीच्या भिंतींमधे लाकडी अडसर घालून एकावर
एक मजले चढवण्याची सोय आहे.
साधारण चौदाव्या शतकातली प्रसिद्ध संतसखू कराडचीच.
कृष्णा मंदीराच्या घाटावरून नदीकाठाने पुढे साधारण १ किमी गेल्यावर संतसखूचे राहते
घर लागते. तिचे विठ्ठल मंदिर व तिथल्या आठवणी आजही ताज्या आहेत. तिच्या सासूने तिला
घराबाहेर काढले. तिथून पंढरपूरला जाणाऱ्या वारीत ती सामील झाली व विठ्ठलमय झाली. स्वतः
विठ्ठलाने तिचे रूप घेऊन तिची सर्व कामे या कराडच्या घरात राहून केली, अशी आख्यायिका
आहे.
अगदी
पूर्वीपासून राजकारणामधे कराडचे नाव अग्रेसर आहे. आदिलशहाने बरीच वर्षे इथे अधिपत्य
गाजवले. १५७६ मधे बांधले गेलेले दोन १०६ फुटी उंच मनोरे याची साक्ष देत आजही उभे आहेत.
या मनोऱ्यात चढायला गोलाकृती जिने आहेत. हे मनोरे टेहळणीसाठी वापरले जायचे. गेल्या
अनेक वर्षांपासून या मनोऱ्यावर चढायला बंदी आहे. योग्य ती डागडुजी करून करून खरे तर
सर्वांसाठी खुला करायला काहीच हरकत नाही. पण . .
जुन्या
गावामधे बैठी घरे जास्त. रविवारपासून शनिवार पर्यंत सर्व पेठा. इतर गावांप्रमाणे इथेही
प्रत्येक पेठेचे वेगवेगळे महत्त्व आणि वेगवेगळे काम. इथली मंडई षट्कोनी आकाराच्या इमारतीत
भरते. तिथली रसरशीत भाजी, फळे आणि सर्वदूर गाजलेली वांगी खूप प्रसिद्ध. तिथे हजारोंनी
अतिशय सुंदर पद्धतीने लावून विकायला ठेवलेली विड्याची पाने आठवून आजही माझ्या अंगावर
रोमांच उभे राहतात.
इ.स.
१८१८ मधे ब्रिटिशांनी राजवट लादल्यानंतर १८५७ च्या बंडामधे कराडच्या धारराव पवार यांनी
पुढाकार घेतला होता. नंतरच्या काळात सर्वश्री यशवंतराव चव्हाण यांचे कर्तृत्त्व तर
सर्वश्रुत आहेच. कराडचा सर्वांगीण विकास घडवण्यात त्यांचा फार मोठा हात आहे. महाराष्ट्राचे
ते पहिले मुख्यमंत्री होतेच. तसेच केंद्रात त्यांनी गृह, संरक्षण ही खाती लीलया सांभाळली.
शिवाय ते भारताचे उपपंतप्रधानही होते. 'विरंगुळा 'हे यशवंतरावांचे राहते घर आज यशवंतराव
प्रतिष्ठान या नावाने त्यांच्या आठवणी जपून ठेवत आहे. कराडच्या नाट्यप्रेमींसाठी यशवंतराव
मेमोरियल हॉलमधे वारंवार नाटके आणि इतर कार्यक्रम घडतात.
असे म्हणतात की पश्चिम महाराष्ट्रात पुण्याच्या
खालोखाल शिक्षणामधे कराडचाच क्रमांक लागतो. टिळक हायस्कुल, कन्या प्रशाला, सायन्स महाविद्यालय,
संत गाडगेमहाराज महाविद्यालय, कराड इंजिनियरिंग महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, कृष्णा
मेडिकल कॉलेज वगैरे अनेक शिक्षण संस्थांनी इथे छान बस्तान मांडले आहे. ही यादी न थांबणारी
असून एकाहून एक हुशार विद्यार्थी कराडने विश्वाला दिले.
पंचांगकर्ते
दाते कराडचेच. सहकारी बँकींगचा पाया कराडमधे कराड अर्बन बँकेने घातला. संपूर्ण जिल्ह्यामधे
क्रिकेटचे एकमेव स्टेडियम फक्त कराडमधे आहे. नेहमी तिथे सामने होतात. गेल्या १५ ते
२० वर्षात गाव सर्व दिशांना वाढत गेले. पूर्वी नदीच्या पलीकडे कोणीच रहायचे नाही, पण
आता सर्वदूर वस्ती होत गेली. शिवाय उंच उंच इमारतीही वाढू लागल्या. मात्र कराडला
Industrial growth खूप कमी राहिली. इथून जवळच ओगलेवाडी आहे. तिथे ओगलेंचा काच कारखाना
होता. त्यांचे कंदील तर खूप प्रसिद्ध. शाळेत असताना आमची सहल हमखास जात असे. बदलत्या
काळाशी व नव्या तंत्रज्ञानाशी समरस न झाल्याने हा कारखाना लोप पावला.
कराड
मधे कृष्णेच्या काठावर माझ्या आजोबांसाठी, माझ्या वडिलांनी टुमदार घर बांधले होते.
तिथे माझ्या बालपणातील काही वर्षे गेली. तिथे रहात असताना दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी
नदीमधे पोहोलो किंवा तिच्या काठावर खेळलो. खरे तर सुमारे १४०० किमी चा मोठा प्रवास
करणाऱ्या कृष्णा नदीला मी इथेच नाही तर इतर अनेक ठिकाणी, अनेक वेळा पाहिले. तिचे शांत
तसेच रौद्र रूपही बघितले. परंतू कराडला जेवढा लळा या नदीने मला लावला तेवढा कुठेच मिळाला
नाही.
कराडच्या
आसपासची काही ठिकाणे अगदी न चुकवण्यासारखी. पहिले ठिकाण म्हणजे समर्थ रामदासांचे चाफळ.
जिथे त्यांची आणि छत्रपतींची पहिली भेट झाली. समर्थांना नदीमधे मिळालेली रामाची मूर्ती
आजही तिथल्या मंदिरात पहायला मिळते. समर्थांनी युवकांमधे व्यायामाची आवड निर्माण व्हावी
या हेतूने ११ मारुतींची स्थापना केली. त्यातले ३ मारुती चाफळमधेच आहेत.
दुसरे
अपरिचित ठिकाण म्हणजे ढेबेवाडीजवळचे पाणेरी गावातले वाल्मिकी मंदिर. या ठिकाणी वाल्या
कोळी लूटमार करी. खड्यांनी भरलेले ७ रांजण (एक माणूस लुटला किंवा मारला की त्याच्या
नांवाने एक दगड रांजणात टाकायचा) इथे पहायला मिळतात. त्यांच्याजवळच वाल्मिकी मंदीर
आहे जिथे नारदांनी सांगितल्यानंतर वाल्याने रामजप सुरु केला. त्याच्या भोवती मोठे वारूळ
बनले आणि मग वाल्याचा वाल्मिकी झाला. ज्या काठीने तो धाक दाखवायचा ती काठी आता एका
मोठ्या झाडाच्या स्वरूपात उभी आहे.
कराड
गावाच्या वेशीवर साधारण ८० च्या दशकात सुरु झालेल्या संगम हॉटेल समोरून जेव्हापासून
उड्डाणपूल झाला, तेव्हापासून खरे तर कराडमधे आत येणे बंदच झाले. साताऱ्याहून पुढे परस्पर
सांगली किंवा कोल्हापूरकडे निघून जातो. पण तरीही त्या भागातली काळी माती, हिरवी शिवारे,
उसाच्या व ज्वारीच्या लोंब्या पाहून मन हरखून जाते आणि अधिक प्रफुल्लित होते. आणि या
परिसरातून निघूच नये असे वाटत रहाते.
Comments
Post a Comment