उन्हाळ्याची सुट्टी
२०२२ चा मे महिना आला आणि माझे मन अनेक वर्षे
मागे जाऊन डोळ्यासमोर अहमदनगर हे शहर तरळले. माझ्या आईचं माहेर - अहमदनगर म्हणजे
नगरच. माझे जन्मगाव. माझ्या शालेय जीवनातील उन्हाळ्याची जवळपास प्रत्येक सुटी
नगरमधे गेली. अगदी बालवाडीपासून अकरावी पर्यंत.
माझ्या आईचे आजोबा साधारण एकोणशे दोन साली अहमदनगरमधे नोकरी करायला पोहोचले आणि तिथे स्थायिक झाले. माझे
पणजोबा चांगले ड्रॉइंग मास्तर
म्हणून खूप प्रसिद्ध होते. माझ्या बाबांच्या बदलीमुळे आम्ही वेगवेगळ्या
गावांमधे राहिलो. कल्याण, कराड, रत्नागिरी, सांगली वगैरे. शालेय शिक्षण या गावांमधे झाले. एक गोष्ट मात्र नक्की ठरलेली, मे महिन्याच्या सुटीमधे आजोळी नगरला जायचंच.
मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकदा का वार्षिक परीक्षा संपली की मग नगरला जायचे वेध लागायचे. मग बाबा जाऊन एसटीचे रिझर्व्हेशन करून यायचे. या चारही गावातून नगरला डायरेक्ट जाणारी कुठलीच एसटी नव्हती. त्यामुळे शक्यतो पुण्याला थांबून एसटी बदलून मग नगरला जायला लागायचे. कधी कधी त्यामुळे पुण्यात मुक्कामही करायला लागायचा, पण तो खूप जीवावर यायचा.
शिवाजीनगरला पुण्याहून नगरला सुटणारी बस निघायची. बस सुटली की मन उचंबळायला लागायचे. वाटेत शिरवळ किंवा शिरूर येथे उसाचा रस मात्र हमखास मिळायचा. हल्ली दोन अडीच तासात पुण्याहून नगरला पोहोचता येते, पण त्यावेळेस चार, साडेचार तास नक्की लागायचे. कधी एकदा नगर येतंय असं वाटायचं.
मी, आई आणि माझा मधला भाऊ यांचा तो प्रवास. पुढे तिसऱ्या भावाचा
जन्म झाल्यावर चौघांचा हा प्रवास. नगर जवळ आल्याची खूण म्हणजे चांदबिबीचा महाल दिसायला लागायचा आणि मस्त वाटायचे.
एसटी नगरच्या स्टॅंडमधे
शिरली की खिडकीबाहेर अक्षरशः डोकं काढून कोण घ्यायला आले ते
शोधायचे. सहसा सर्वात
लहान मामा घ्यायला यायचा.
मामा भेटला रे भेटला की त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारायची. मग जे छोटे से सामान असेल ते घेऊन धावत धावत टांगा स्टॅन्ड कडे.
टांगा कुठला घ्यायचा त्याच्याकरता हमरातुमरी. मग टांगेवाल्यांशी
हुज्जत. अक्षरश: पंचवीस पैसे पन्नास पैशासाठी. मात्र चांगला घोडा असलेल्या टांग्यात मी जाऊन बसायचो आणि तोच टांगा ठरवला जायचा. टांग्यात मी मात्र सहसा पुढेच बसायचो. कधीच मागे बसलेले आठवत नाही.
मामा सायकल घेऊन आलेला असायचा. आणि
त्याच्याबरोबर टांग्यातून शर्यत. अंतर थोडेसे. स्टॅन्ड नंतर माळीवाडा वेस, नंतर
सिटीलाईन. एकदा का दगडी चर्चचा घुमट दिसू लागला की घर. मनात उकळ्या फुटायला लागायच्या.
घर आले की तिथे टांग्यातून उडी मारून खाली उतरायचं.
हा साधारण दोनशे अडीचशे वर्षे जुना वाडा. त्या वाडय़ाच्या दोन भागांपैकी एक भागामधे आमचं घर. सर्वात पुढे दीड-दोन फुट उंचीचा
एक मोठा दगडी चौथरा. त्या चौथऱ्याच्या पाठच्या बाजूला एक उंच लाकडी दिंडी दरवाजा. हा दिंडी दरवाजा खूप मोठा होता आणि त्या दरवाजात आजी तुकडा ओवाळायला घेऊन यायची. एकदा
ओवाळणे झाले की मग आत धावत सुटायचे.
दिंडी दरवाज्यातून आत उजवीकडे गेल्यावर डावीकडे एक ४, ५ पायऱ्यांचा
चौथरा. त्याच्या उजवीकडे हात पाय धुवायला मोरी. समोर संडास. आणि पायऱ्या चढून गेले की मग घरात प्रवेश. घरात आत शिरताना मुख्य दरवाजाच्या आतमधे एक खोल खड्डा होता. कशासाठी होता हे मात्र कळलेच नाही. आत शिरल्यावर उजव्या हाताला दोन कपाटे असायची. त्या कपाटांमुळे
हॉलचे दोन भाग झालेले. एका
भागामधे डावीकडे बैठक आणि कपाटांच्या मागे बेडरूम. समोर चालत गेलं की स्वयंपाकघर.
स्वयंपाकघर खूप मजेशीर होतं. आत शिरल्यावर डावीकडे दोन इंचाचा उंबरठा होता. त्याच्या पलीकडे भिंतीलगत चुलीची जागा. थेट लाकडावर पेटणारी चूल. आणि उजव्या हाताला भिंतीलगत कोठीची जागा. त्यामधे एक उखळ, पाटा वरवंटा आणि जाते असायचे.
स्वयंपाकघराच्या पलीकडे एक न्हाणीघर.
नंतर माजघर. माजघर ओलांडून गेले की देवघर. देवघराच्या अलीकडे डाव्या हाताला दरवाजा. त्या दरवाजात खाली उतरलं की वाड्याचा मधला चौक. या चौकात तुळशी वृंदावन आणि मधोमध एक मातीचा ढिगारा.
माजघराला एक लांबच
लांब खिडकी होती. त्यातून पलीकडे सगळं दिसायचे.
सर्वप्रथम देवघरात जाऊन दर्शन. मग सगळ्यांना नमस्कार. आणि दंगा करायला
सुरुवात. माझ्या आईला तीन भाऊ, दोन बहिणी. सगळ्यात मोठा मामा मॅट्रिकनंतर जवळपास बाहेर शिकायला बाहेर पडला. फार कमी वेळा त्याची आमची मे महिन्यात भेट झाली. आजोबा सांगलीजवळ तुंग या गावी शेती करायचे. ते अधूनमधून नगरला यायचे. घरात असायचे ते म्हणजे माझी आजी, दोन मामा आणि दोन मावश्या.
संपूर्ण घर शेणाने सारवलेले.
फरशी फक्त न्हाणीघरात. अहमदनगर मोठे शहर. साडेचारशे पाचशे वर्षे जुने. खरं तर जिल्ह्याच गाव, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या घरात वीज नव्हती. आणि त्या काळातही टोपलीचे संडास. घरात वीज नाही त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकाल किती वेगळी धमाल असेल. खरं तर वीज सहज घेता आली असती, पण हे होते भाड्याचे घर आणि नेहमीप्रमाणे घरमालकाशी भांडण. त्यामुळे वीज लांबणीवर पडली.
नगर हे दुष्काळी आणि बिनपाण्याचे गाव. जवळपास सूर्योदयाच्या आधी सर्वजण उठायचे आणि पहिला कार्यक्रम पाणी भरणे. दिंडी दरवाजाच्या बाहेर खोल खड्ड्यामधे एक म्युनिसिपाल्टीचा नळ असायचा. ४, ५ पायऱ्या उतरून त्या खड्ड्यात पाणी भरावे लागायचे. घरातील जवळपास सर्व या कामाला लागायचे. त्यावेळी पाणी भरले गेले तर ठीक. नाहीतर टँकर मागवायला लागायचा.
पाणी भरणे कार्यक्रम झाला की मग व्यायाम. पाण्याच्या खड्ड्याजवळच एक डबल बार होता. म्युनिसिपाल्टीने लावलेला. त्या डबल बारवर लहान मामा प्रचंड व्यायाम करायचा. त्याचे वेगवेगळे प्रकार तिथे पाहायला आश्चर्यचकित वाटायच. आतमधे मधला मामा सूर्यनमस्कार आणि योगासनांचे वेगवेगळे प्रकार करायचा. त्या दोघांबरोबर आम्हीपण थोडे हातपाय
हलवायचो.
व्यायाम
झाल्यावर अधूनमधून आम्ही सिद्धी बागेतल्या तरण तलावावर पोहायला जायचो. मी व माझा भाऊ तिथेच पोहायला शिकलो. पोहण्याची मजा काय वेगळीच असते, नाही. अजिबात पाण्यातून बाहेर यावंसं वाटायचं नाही. पण हळूहळू खूप गर्दी वाढायची आणि नाईलाजाने आम्ही तलावातून बाहेर पडायचो.
घरी आल्यावर अंघोळ आणि मग देवघरात रवानगी. प्रथम
मामांबरोबर संध्या आणि मग त्यांनी केलेली देवपूजा टक लावून बघायचो. देव्हाऱ्यात खूप देव होते. त्यातील शाकंबरी देवीला छान महिरप आणि तिला सुंदर सुंदर कपडे असायचे. हे देवघर सुंदर वाटायचं, की तेच मनामधे माझ्या बरीच वर्ष राहिलं आणि अबुधाबीमधे
तसंच देवघर मी स्थापन करू शकलो. पूर्ण पूजा सोवळ्यात केली
जायची.
संध्या आणि पूजा झाली की खूप भूक लागलेली असायची. आजीच्या हातचा नाष्टा तयार असायचा. त्यावर तुटून पडायचं. आजी पूर्ण स्वयंपाक सोवळ्यात करायची आणि तोही चुलीवर. तिचा स्वयपाक चालू असताना त्या दीड दोन इंचांच्या उंबरठय़ाच्या आत कोणालाही प्रवेश नसे. दुपारी साडेबाराच्या आसपास जेवायला बोलावणे यायचे. आम्ही सगळे जण रांगेने बसायचो. आजी चुलीवरची गरमागरम पोळी किंवा भाकरी हाताने उडवत पाठवायची प्रत्येकाकडे. गरम गरम जेवण खूप चटकदार लागत असे.
कधी कधी पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, आमरस वगैरे पदार्थांची रेलचेल असायची. तृप्त जेवण झाले की मग दुपारची वामकुक्षी
किंवा पुस्तक वाचन. मग बैठे खेळ. किती वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळलो याची गणनाच नाही . पत्त्यांचे
तर एवढे वेगवेगळे प्रकार खेळून झाले, काय सांगू? साडेचार वाजले की मग बाहेरच्या अंगणामधे खेळ सुरू. त्यात विटी दांडू, लगोरी, क्रिकेट वगैरे अनेक.
साधारण सहाच्या आसपास कपडे वगैरे बदलून संध्याकाळी फिरायला बाहेर पडत असू. आजी प्रवचनाला बाहेर पडे. आई आणि बहिणी वेगळ्या फिरायला जायच्या. दोन्ही मामा वेगवेगळे फिरायला जायचे. मधला मामा कट्ट्यावर जायचा. त्याच्या मित्रमंडळींच्या गप्पांचे ठिकाण. आम्हा छोटय़ांना तो कधीच बरोबर येऊ द्यायचा नाही. मग लहान मामाबरोबर आम्ही निघायचो. जास्तीत जास्त मजल म्हणजे दिल्ली दरवाजा पलीकडचं देऊळ.
संध्याकाळी फिरून घरी आले की मग दिवेलागण. वेगवेगळ्या
आकारातले वेगवेगळे दिवे घरात लावले जायचे. त्यानंतर शुभकरोति, सर्व प्रार्थना, पाढे आणि मग जेवण. जेवण झाले की मग दिव्याच्या अंधुक प्रकाशात पुन्हा काही पत्त्यांचे डाव रंगायचे. आणि मग एकेक जण झोपले की आपण झोपी जायचे. सोफा, डायनिंग टेबल, बेड आणि गाद्या वगैरे
काहीच नव्हते. सतरंजी, त्यावर घोंगडे किंवा गोधडी. आणि
अंगावर पातळ चादर. काय गाढ झोप लागायची म्हणून सांगू.
अधूनमधून कधी सकाळी नाष्टा झाला की मग वेगवेगळ्या
कामासाठी बाहेर पडत असू. चौपाटी कारंजाजवळ
दुधाचा बाजार भरत असे. आसपासच्या खेड्यातील शेतकरी त्यांचे दूध तिथे
विकायला आणायचे. आज आठवून आश्चर्य वाटते, पण दुधाची क्वालिटी पाहायची पद्धतच खूप विचित्र होती. दुधाच्या कॅनचे झाकण उघडायचे. त्यात हात घालायचा. हात बाहेर काढून हाताला दुधाचे किती कण लागले आहेत ते पाहायचे. जवळपास मनगटापर्यंतचा हात दुधात घालयाचा. दुधाचे
जितके जास्त कण तेवढी दुधाची घनता जास्त. तेवढा त्याचा भाव जास्त.
काही वेळा मंडईत भाजी आणायला जायचो. तो खूप मस्त आनंददायी प्रकार होता. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ढीग करून रचलेल्या असायच्या आणि सगळे भाजीवाले आलेल्या लोकांना आपल्याकडे बोलवून घेत रहायचे . मला स्पष्ट आठवतोय त्यामधे एक
मुका होता. हातवारे करून आणि आरडाओरडा करून तो सर्वांना बोलवायचा. त्याच्यासमोरच्या भाजीच्या ढिगाऱ्याजवळ छोट्या पाटीवर खडूने भाजीचे दर लिहिलेले असायचे. त्याची भाजी खरंच चांगली असायची.
बाजारामधे मे महिन्यात आंबे यायचे. पण ते गोटी
आंबेच असायचे. हापूस, पायरी वगैरे दिसायचे नाहीत. आंबे निवडायची पद्धत मस्त. हव्या
त्या ढिगातला आंबा निवडायचा. तो तिथेच पिळून रस थोडा बाहेर काढून चाखायचा आणि
पॅन्ट ला हात पुसायचा. ज्या काळात आम्ही रत्नागिरीत राहायचो, त्या उन्हाळ्यात बाबा
रत्नागिरीहून हापूस व पायरीची पेटी पार्सलने पाठवायचे. एसटी ने ती पेटी स्टॅन्ड वर
यायची आणि आम्ही ती जाऊन घरी घेऊन यायचो.
एखाद्या दिवशी घरात आईस्क्रीम करायचा प्रोग्राम असायचा. मामाबरोबर जाऊन सायकलच्या कॅरिअरवर बर्फाची मोठी लादी
घेऊन यायचो. आईस्क्रीमचे मशीन भाड्याने मिळायचे. ते हाताने फिरवावे
लागायचे. घरातील प्रत्येक जण टर्न बाय टर्न फिरवायचे. काय चव लागायची त्या आईस्क्रीमची व्वा वा. तीन चार दिवसातून कधीतरी दुपारी रस्त्यावरून उसाचा गाडा जायचा. आणि मग उसाचा रस प्यायचा प्रोग्राम व्हायचा. तो गाडाही हाताने फिरवला जायचा. लाकडी घाणा होता, त्या उसाची चव खूप मस्त लागायची.
बऱ्याच वेळा नगर वाचनालयातून पुस्तके आणली
जायची आणि हमरीतुमरीवर येऊन सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडला जायचा. खूप वेळा आम्ही नगरचा किल्ला बघायला जायचो. तो किल्ला पहायला खूप आवडायचं. तिथे आम्ही खूप वेळ घालवायचो. झुलत्या पुलाच्या फळ्या हळूहळू तुटत जाताना आम्ही पाहिल्या आहेत . गावांमधे शहाजी आणि जिजाबाईंचे लग्न ठरले तो वाडाही बघितल्याचे स्पष्ट आठवतोय.
नगरचे संग्रहालयही बऱयाचवेळा बघितल्याचे आठवतंय. त्यात उत्खननात सापडलेल्या चार पाचशे वर्षांपूर्वीच्या अजब गोष्टी पाहून मन थक्क होते. त्यावेळी निजामाने मातीच्या पाईप्स टाकून पाण्याची अप्रतिम सोय केली होती, त्याचे नमुनेही पहायला मिळतात. निजामाची काही पत्र, एक फर्मानही तिथे आहे.
अधूनमधून नगरच्या जवळपासची ठिकाणे फिरून यायचो. कापूरबावडी,
भिंगार, केडगाव वगैरे. मात्र
सगळीकडे सायकलनेच जायचो. एक दोन वेळा मामा सावेडी रोडवर घेऊन गेला होता. त्यावेळेस एमआयडीसी तिथे येणार आहे वगैरे वगैरे त्यांनी समजावून सांगितले होते . मग एमआयडीसी म्हणजे काय कारखान्यांची कशी गरज आहे, छान पद्धतीने त्याने समजावले होते.
एखाद्या दिवशी सिनेमा पाहायचा प्रोग्राम ठरण्याचा. मला सिनेमाचा भयंकर तिटकारा होता. आज खरच सांगून पटणार नाही. तर घरातले सगळे जण खूप मागे लागायचे पण मी कधीच सिनेमाला जायचो नाही. सगळे सिनेमाला आणि मी आजीबरोबर त्या दिवशी प्रवचनाला जायचो.
घरात फोन नव्हता. सगळे कम्युनिकेशन हे फक्त पत्रातून. या सहा सात आठवडय़ांच्या काळात बाबांचे दोन तीन पत्रे यायची. आमचीही
दोन तीन पत्र जायची. त्यातल महत्त्वाच पत्र म्हणजे शाळेचा रिझल्ट.
हळूहळू काही वर्षांनी घरात वीज आली. वीज आल्यावर पहिली खरेदी झाली ती म्हणजे रेडिओ. त्या रेडिओवर सगळे जण फिदा. साठच्या दशकातील सर्व हिंदी गाणी ऐकून ऐकून इतकी पाठ झाली की विचारू नका. मदन मोहनची खूप गाणी त्या वेळेस कानात घर करून बसली ती कायमची.
असे करत करत हळूहळू मे महिना संपायचा. जून सुरू झाला की मग परतीचे वेध लागायचे. जाम कंटाळा यायचा. पण बाबांचीही खूप आठवण येत राहायची. जूनच्या पहिल्या आठवड्यात कधी तरी बाबा नगरला दोन तीन दिवसांसाठी
यायचे. आणि मग आम्ही सगळे परतीच्या प्रवासाची तयारी करायचो. सामानसुमान बांधून झाले की मग सिटी लाईनवरून टांगा आणला
जायचा. टांगा दारात उभारला की आम्ही भोकाड पसरायचो. सगळ्यांना नमस्कार करून ओल्या डोळ्यांनी घराबाहेर पडायचो.
पुन्हा पूर्ण वर्षाची वाट पहायला लावणारी ही उन्हाळ्याची सुटी एकदाची संपायचीच. परतीचा पूर्ण प्रवास अगदी शांत व्हायचा. महिनाभरात काय काय गमतीजमती केल्या, त्या सारख्या आठवत राहायच्या. त्याकाळी तर नगर ते रत्नागिरी हा प्रवास खूप मोठा
वाटायचा. वाटेत कधी कधी पावसाळी ढगांनी वातावरण एकदम कोंदट असायचे. त्यामुळे उदासी अजून वाढायची. कसेबसे पाय ओढत घरात पाऊल टाकायचे आणि पुढच्या आयुष्याला सुरुवात करायचो.
त्या काळात मिळालेले आजी,
आजोबा, मामा, मावशी यांचे प्रेम ही आयुष्याची शिदोरी बनली. इतके निखळ, निस्सीम, नितांत प्रेम. त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. साध्या राहणीतून आयुष्यासाठी काही धडेही मिळाले. त्या धड्यांमुळे
आजही पाय जमिनीवर असावेत ही शिकवण सतत आठवण देत राहते. त्या काळात मिळालेले ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडत आहे.
आजच्या टी. व्ही. आणि मोबाईलच्या युगामधे
वीजेशिवाय पूर्ण आयुष्य ही कल्पना आपल्या तरी पचनी पडणे अवघड जाईल. नाही का?
आजच्या मुलांची उन्हाळ्याची सुटी आमच्याएवढी चांगली जात असेल का हो? आणि अजिबात
पैसे खर्च न करता आनंद घेता येतो हे त्यांना पटेल का?
माझ्या दहावीनंतर मावशी व मामांची हळूहळू लग्ने झाली. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या संसारात सुस्थिर झाले, पण एकमेकांची ओढ कधीच संपली नाही. १९८२ - ८३ मधे घरमालकाने
घर परत ताब्यात घेतले आणि आम्हाला तो वाडा सोडावा लागला. आजही तो पडका वाडा तशाच स्थितीत आहे. आता राहिल्या त्या फक्त रम्य आठवणी.
-
नरेंद्र कुलकर्णी..
narendra.v.kulkarni@gmail.com
Comments
Post a Comment