बारा गांवचे पाणी - भाग पहिला

 २००५ - २००६ मधील अबुधाबी महाराष्ट्र मंडळाच्या मासिक बहर मधे "बारा गांवचे पाणी" ही मालिका प्रकाशित झाली होती. ती आता नव्या रूपात पुनःप्रकाशित होत आहे. आपले अभिप्राय कळवावे.

-      नरेन्द्र कुलकर्णी

बारा गांवचे पाणी - गांव पहिले - पैठण

औरंगाबादपासून ४८ कि.मी. वर वसलेले अतिप्राचीन गांव - पैठण. 'प्रतिष्ठान’ या नांवाने असंख्य दस्तऐवजात याचा लक्षणीय उल्लेख आढळतो. नक्कीच ३००० वर्षांहून जास्त जुने शहर. या गावाने अफाट वैभव अनुभवले. शतकानुशतके मोठी होत गेलेली राजघराणी त्यांचा राज्यविस्तार बघितला. अनेक शूरांचे गोडवे गायले आणि त्याचबरोबर उतरती कळाही पाहिली.

वाल्मिकी रामायणात उल्लेखल्याप्रमाणे वैवस्वत मनुचा मुलगा ईला याने प्रतिष्ठानची स्थापना केली. त्याचा मुलगा पुरुरवा याने राज्याचा विस्तार केला. पुढे सातवाहनांनी प्रतिष्ठान ही राजधानी केली. आणि भरभराट केली. या काळात हे वेदपठणाचे केंद्र बनले, आणि दक्षिण काशी म्हणून ओळखली जाऊ लागली. १२ भट्टी नावाची १२ वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कुळे इथे वसली होती. त्यामधील काही कुळे आजही इथे आहेत. शिवराज्याभिषेकाचे गागाभट्ट यांपैकी एक.

इसवी सन ७८ मधे सातवाहनांचा राजा शालिवाहन याने शकांचा पराभव करून त्यांचे राज्य बळकावले. त्यावेळी उभारलेला विजयस्तंभ आजही गावात शिरताना आपले स्वागत करतो. या घटनेच्या निमित्ताने शालिवाहनने नवीन कालगणना सुरु केली, जी आजही आपण वापरतो त्यालाच शालिवाहन शक”” म्हणतात.

सातवाहनांनी राज्य केलेला भूभाग सोबतच्या नकाशात दाखवला आहे. साधारण ..च्या तिसऱ्या शतकात सौराष्ट्र ने सातवाहनांना जिंकून घेतले, त्यानंतर आंध्र राजाने, आणि मग उतरती कळा जी लागली की मग पैठण परत आपले वैभव मिळवू शकलेच नाही.

त्या काळात ज्या काही कला परंपरा इथे सुरु झाल्या, त्या अजूनही सुरु आहेत. त्यातलीच मुख्य परंपरा म्हणजे जगप्रसिद्ध पैठणी. सुमारे २५०० वर्षांपासून आजतागायत पैठणीची शान अजूनही टिकून आहे. संपूर्ण भारतातील हातमागावर साडी विणण्याची ही पहिली कला. पैठणमध्ये आजही वेगवेगळ्या गल्ल्यांमधे चांदी, रेशीम, रंग यांची कामे चालताना दिसतात. बांगडी-मोर आणि पोपट हे पैठणच्या पैठणीतील महत्वाचे घटक. आजही इथे 

पैठणीचे काम हातावर करणारे अनेक हातमाग कार्यरत आहेत. एक साडी पूर्ण व्हायला साधारण ते १० महिने लागतात. कारागिरांचे एकाच दुःख की त्यांना कामाचा योग्य तो मोबदला मिळत नाही.

ग्रीक चिनी प्रवाशांनी (हो--त्से तुंग) पैठणला भेट दिली होती त्या काळाचे उत्तम वर्णन लिहून ठेवलेले आहे. त्यांच्या मते त्या काळातील हे सर्वात भरभराटीचे शहर होते. कला, विद्या आणि शौर्य यांचा सुरेख संगम होता. तसेच त्या काळात इथे फार मोठी बाजारपेठही होती. न्यायनिवाड्याची अतिशय उत्तम सोय होती. अनेक कठीण समस्यांची इथे उलगडा घडायची आणि इथे एक उच्चं न्यायासनही होते. शिवाय वेगवेगळ्या कवी वादकांना राजाश्रय होता.

चक्रधरस्वामी इथलेच. त्यांचा लीळा-चरित्र हा ग्रंथ आजही नावाजलेला आहे. पैठणजवळ १२ मैल अंतरावरील आपेगांवात संत ज्ञानेश्वरांचा व त्यांच्या ३ भावंडांचा जन्म झाला. त्यांच्या आईवडिलांच्या आत्महत्येनंतर चारही भावंडांनी पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे शुध्दीपत्रासाठी धाव घेतली. संन्यास संपवून गृहस्थाश्रमात परतल्याची पहिलीच घटना असल्याने न्यायासन शुध्दीपत्र देऊ शकले नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानदेवांनी रेड्यामुखी तिथेच वेद वदवले. पुढे चांगदेवांचे भिंत चालवून इथेच स्वागत केले.

आज पैठण हे नाथांचे (संत एकनाथ महाराजांचे) म्हणून ओळखले जाते. त्यांचे जन्मगांव व कर्मभूमी हीच. त्यांच्या राहत्या वाड्यात त्यांचे वंशज आजही रहात आहेत. निर्मळ भक्ती आणि जातीभेदापलीकडील समानत्व मानणाऱ्या नाथांकडे स्वतः विठुराया नोकर म्हणून १२ वर्षे राहिला. त्या 'श्रीखंड्या' ची सहाण व तो भरत होता ते रांजण आजही पाहायला मिळते. फार मोठी संत-परंपरा इथून सुरु झाली. छत्रपतींनी वारंवार भेट देऊन मुघलांच्या विरुद्ध चोख बंदोबस्त ठेवला व तोच वारसा पेशव्यांनी चालू ठेवला.

पैठण मधे नाथांचे घर, विशेषत्वे त्यांचे देवघर आणि गोदावरी काठी असलेली समाधी अवश्य पहावी. पावसाळ्यात गोदावरीला महापूर यायचा व गावेच्या गावे वाहून जायची. आणि उन्हाळ्यामध्ये संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत जायचा. त्यावर तोडगा म्हणून गोदावरीवर जायकवाडी प्रकल्प उभा केला. १९७६ ला या मोठ्या धरणाचे उदघाटन झाले. त्यामागे "नाथसागर" हा महाप्रचंड जलाशय तयार झाला आणि दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटला. याच धरणाजवळ "ज्ञानेश्वर तबक उद्यान "या नावाची म्हैसूरच्या वृंदावन गार्डन च्या धर्तीवर बाग फुलवली. तीही पाहण्यासारखी आहे. संगीताच्या तालावर उडणारे कारंजे मनोहर दिसतात.

गावात आता असंख्य लघु उद्योग सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या सरकारी योजनांमुळे तरुणांना फायदा होत आहे. मात्र ईतक्या वैभवशाली जागेचे सध्याचे रूप पाहून मन गहिवरून येते.

Comments

Popular posts from this blog