बारा
गांवचे पाणी - भाग दुसरा
- नरेन्द्र कुलकर्णी
बारा
गांवचे पाणी - गांव दुसरे – रामटेक
या सदरातील
पुढचे गावं रामटेक. हेही पैठण सारखेच अति प्राचीन. नागपूरपासून ४२ कि.मी. वर. सातपुड्याची
सुंदर पर्वतरांग आणि त्यातील एक नयनमनोहर टेकडी म्हणजे रामटेक. प्रभू रामचंद्र, सीतामाई
आणि लक्ष्मणासहित चित्रकूटाहून पंचवटीकडे जाताना इथे काही काळ राहिले (टेकले) म्हणून
या जागेचे नांव - रामटेक. कदाचित रामटेकडी या नावाचे पुढे रामटेक नाव झाले असेल. या
टेकडीच्या सुमारे ५०० पायऱ्या चढताना असंख्य रामसेनेला (वानरांना) तोंड द्यावे लागते.
अगदी माथ्यावरसुद्धा. त्यामुळे जपूनच राहावे.
प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यात अगस्ती
ऋषींनी इथे दर्शनाला येऊन एक यज्ञ केला. त्या यज्ञाची पेटती धुनी आजही तिथे पाहायला
मिळते. टेकडीवर रामाचे देऊळ आहेच. याशिवाय लक्ष्मणाचे वेगळे मंदिर आहे. भारतीय पुरातत्व
खात्याच्या अंदाजानुसार दोन्ही मंदिरांचे वय ३५०० वर्षांहून अधिक आहे. जवळच असेलला
रामसागर हा रमणीय तलाव सौंदर्यात अधिक भर घालतो.
महाकवी कालिदासाचे
हे जन्मगाव. इथल्या निसर्गरम्य वातावरणात प्रेरित होऊन त्याने 'मेघदूत' या महाकाव्याची
रचना केली. व नंतर त्याने उज्जैन इथे जाऊन विक्रमादित्याकडे दरबारात स्थान मिळवले.
कालिदासाचे सुंदर स्मारक इथे पाहायला मिळते. रामटेकच्या पायथ्याशी असलेला खिंडसे तलावही
पहाण्यासारखा आहे.
रामटेकमधे दिवाळी
नंतर कार्तिक महिन्याच्या त्रिपुरी पौर्णिमेला १५ दिवस खूप मोठी जत्रा भरते. व मोठी
गर्दी उसळते. खूप लांबलांबून लोक येतात. एक दोन शतकांहून जास्त काळ रामटेकचे 'पान'
खूप प्रसिद्ध आहे. नागपूरकर भोसले आणि नंतर ब्रिटिशांनी सुद्धा पानमळ्यांच्या लागवडीसाठी
भरपूर प्रोत्साहन दिले. इथली हवा खार तर कोरडी. म्हणून जागोजागी पानमळे Green
Houses मध्ये दिसतात.
संघ सरसंघचालक
गोळवलकर गुरुजींचा जन्म रामटेकचा. कविकुलगुरू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड सायन्स,
कविकुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी आणि श्री नरेंद्र तिडके कॉलेज ऑफ आर्टस्
अँड कॉमर्स ही रामटेकमधील काही गाजलेली कॉलेजेस. जी इथली शैक्षणिक भूक भागवतात.

Comments
Post a Comment